नांदेड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; हदगावात मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टरवर, गुन्हा दाखल
नांदेड ता.१७ : नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागातील रुग्णांना आम्ही डॉक्टर आहोत अशी थाप मारून मुन्नाभाई बोगस डॉक्टरांची टोळी सक्रिय झाली आहे. अशाच एका मुन्नाभाई डॉक्टरवर हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात वाडी तांड्यावर जाऊन विविध आजारावर आम्ही उपचार करतो असे आमिष दाखवून स्वतःजवळ कुठलीच वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, प्रमाणपत्र किंवा अनुभव नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकही त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. हदगाव आणि हिमायतनगर तालक्यामध्ये या बोगस डॉक्टरांनी चांगलेच बस्तान मांडल्याचे हदगावच्या शासकीय रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच्या व्यवसायाबद्दल व शिक्षणाबद्दल माहिती विचारली असता यावेळी बोगस डॉक्टरची चांगलीच बोबडी वळती झाली अखेर त्याला हदगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डॉ. मुरमुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक फोलाने करत आहेत. या बोगस मुन्नाभाई डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने हदगाव व हिमायतनगर परिसरातील अन्य सहकाऱ्यांना समजताच त्यांनाही घाम फुटला आहे.
यातच सध्या सर्दी, खोकला, ताप तर दुसरीकडे कोरोनाचे संकट असल्याने ग्रामीण भागातील नागरिकही हैराण झाले आहेत. शहरी भागातील वैद्यकीय सेवा घेण्यासाठी त्यांना मोठी कसरत व आर्थिक गोष्टींचा मोठा सामना करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर आजार कमी व्हावा यासाठी ते अशा बोगस मुन्नाभाई डॉक्टरांच्या घातक उपचाराला बळी पडत आहेत. वेळप्रसंगी या उपचारांचा त्यांना दुष्परिणामही होतो. हदगाव तालुक्यातील कोळी या गावातही असाच एक बोगस मुन्नाभाई डॉ. संजीत बारई याने त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीच पदवी, प्रमाणपत्र व अनुभव नसताना खासगी वैद्यकीय रुग्णालय सुरू केले होते. या रुग्णालयांमध्ये तो रुग्णांवर उपचार करत होता.